खासदारांच्या अपात्रतेचा अर्ज निकाली   

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात दाखल अर्ज निकाली काढला.वास्तविक, दोन्ही पक्षांनी अध्यक्षांकडे या प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, अध्यक्षांनी अर्ज निकाली काढला.
 
राज्यसभा सदस्य नियम १९८५ कलम ६ (२) अंतर्गत २० नोव्हेंबर २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यानंतर, २१ नोव्हेंबर २०२३ रोजी चव्हाण आणि पटेल यांनीदेखील असाच अर्ज दाखल केला होता. हे दोन्ही अर्ज राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत करण्यात आले होते. काल अध्यक्षांनी ३ फेब्रुवारी, २०२५ रोजी दोन्ही राष्ट्रवादीकडून कारवाई न करण्यासंदर्भात मिळालेल्या विनंतीनुसार अर्ज निकाली काढले. चव्हाण यांचा राज्यसभेतील कार्यकाळ २ एप्रिल २०२४ रोजी पूर्ण झाला. तर पटेल यांचा कार्यकाळ २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपला होता. मात्र, ३ एप्रिल २०२४ रोजी सहा वर्षांसाठी पक्षाने त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठविले आहे. खान यांचा कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिलमध्ये संपणार आहे.

Related Articles